Tuesday, July 22, 2014

स्वप्नातल्या कळ्यांनो...


स्वप्नातल्या कळ्यांनो...

काही गाण्यांमध्ये शब्द असतात तर काही गाण्यांमध्ये भावनाच शब्दांचे रुप घेऊन आलेल्या असतात. कधीतरी अकस्मात त्या आपल्या मनःपटलावर अवतरतात...
स्वप्नातल्या कळ्यांनाही न उमलण्याची विनंती करताना ही भावना काय कारण देतेय...गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा! अपूर्णतेतच खरी गोडी दडलेली आहे, याची याहून सुरेख आणि तरळ जाणीव शब्दात व्यक्तता येणारच नाही. जेव्हा भावनांना विहरण्यासाठी स्वतःचं असं अवकाश होतं..तेव्हाच त्यात एक उत्स्फूर्तता होती, उत्कटता होती. काळ कीतीही बदलला, तरी जाणिवा त्याच राहतात, युगानुयुगे...आपण आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःला फसवित असतो. गॅझेटस् आली, तंत्रज्ञानाने क्रांती आणली, फोनसुद्धा स्मार्ट झाले...तरीही बोलणे-ऐकणे-आणि एकमेकांना मेसेज करुन क्षणभरापुरते संवादात रमविणे...याच्याही पलीकडे जाणिवांचे विश्व असते आणि तेच खरे असते...याची जाणीव क्वचितच होते..ज्यांना होते, ते खरोखर भाग्यवान. या जाणिवेची आर्त साद हीच असते....उमलू नकाच केव्हा.
ज्यांच्या पावलांनी कधी थेट जमिनीवरची मातीच अनुभवली नाही, त्यांना प्रवासातली मजा कळणार नाही.
ज्यांच्या डोळ्यांना स्वप्नात का असेना खरंखुरं स्वप्नंच कधी भेटलं नाही, त्यांना जागेपणा आणि स्वप्न यांतलं सुरेल नातंही कधी उमजणार नाही.
ज्यांच्या हातांची कधी ओंजळच झाली नाही, त्यांना देण्यातलादेखील आनंद कधी गमणार नाही..
ज्यांचं मनच कधी उमगलं नाही...त्यांना पाऊस आणि उन्ह ही केवळ नैसर्गिक क्रिया वाटणार.
म्हणूनच, कधी कधी स्वतःलाच भाग्यवान समजावं...
ज्यांना स्वप्नांचं मोल ठाऊक आहे...
ज्यांना कळ्यांचं दुःख ठाऊक आहे...
ज्यांना अपूर्णतेची गोडी अजूनही छळते आहे
आणि ज्यांचे चित्त अजूनही क्षितिजापार जावयास धडपडते आहे....
जगाचे...जनांचे विश्व आणि मनाचे जग प्रचंड निराळे आहे.
जाणवते सर्वांना पण शोधता येत नाही.
ज्यांना शोधावेसे वाटते...त्यांना जगात परतावेसे वाटत नाही.
म्हणून, हे सुद्धा एक स्वप्नच असू देत...कधीच पूर्तता न होणारे.

काट्याविना न हाती..केव्हा गुलाब यावा? ....
अजून काय सांगायचे!


- संतोष
22.07.2014

No comments:

Post a Comment