Monday, July 28, 2014

क्षितिज म्हणुनि राहती....

क्षितिज म्हणुनि राहती....
बोलली काहीच नाही, देऊन मजला पाकळी
जाणीवांची वंचना तव ओंजळींनी झाकली..
प्रत्येकदा स्वप्नात आली स्तब्धता तव आडुनि;
मैफलीतून अन् मनांच्या कोण गेले गाऊनि...
आजही माझ्या उशाशी कालचा तो मोगरा;
हुंदक्यांचा प्रहर आणि गंधला तेव्हा खरा...
विखुरल्या लाटांस शोधी भावनांची गलबते ही;
क्षिजित म्हणुनि राहती...माझिया गझलेतही..!
- संतोष देशपांडे, मांडवेकर

Tuesday, July 22, 2014

स्वप्नातल्या कळ्यांनो...


स्वप्नातल्या कळ्यांनो...

काही गाण्यांमध्ये शब्द असतात तर काही गाण्यांमध्ये भावनाच शब्दांचे रुप घेऊन आलेल्या असतात. कधीतरी अकस्मात त्या आपल्या मनःपटलावर अवतरतात...
स्वप्नातल्या कळ्यांनाही न उमलण्याची विनंती करताना ही भावना काय कारण देतेय...गोडी अपूर्णतेची लावेल वेड जीवा! अपूर्णतेतच खरी गोडी दडलेली आहे, याची याहून सुरेख आणि तरळ जाणीव शब्दात व्यक्तता येणारच नाही. जेव्हा भावनांना विहरण्यासाठी स्वतःचं असं अवकाश होतं..तेव्हाच त्यात एक उत्स्फूर्तता होती, उत्कटता होती. काळ कीतीही बदलला, तरी जाणिवा त्याच राहतात, युगानुयुगे...आपण आधुनिकतेच्या नावाखाली स्वतःला फसवित असतो. गॅझेटस् आली, तंत्रज्ञानाने क्रांती आणली, फोनसुद्धा स्मार्ट झाले...तरीही बोलणे-ऐकणे-आणि एकमेकांना मेसेज करुन क्षणभरापुरते संवादात रमविणे...याच्याही पलीकडे जाणिवांचे विश्व असते आणि तेच खरे असते...याची जाणीव क्वचितच होते..ज्यांना होते, ते खरोखर भाग्यवान. या जाणिवेची आर्त साद हीच असते....उमलू नकाच केव्हा.
ज्यांच्या पावलांनी कधी थेट जमिनीवरची मातीच अनुभवली नाही, त्यांना प्रवासातली मजा कळणार नाही.
ज्यांच्या डोळ्यांना स्वप्नात का असेना खरंखुरं स्वप्नंच कधी भेटलं नाही, त्यांना जागेपणा आणि स्वप्न यांतलं सुरेल नातंही कधी उमजणार नाही.
ज्यांच्या हातांची कधी ओंजळच झाली नाही, त्यांना देण्यातलादेखील आनंद कधी गमणार नाही..
ज्यांचं मनच कधी उमगलं नाही...त्यांना पाऊस आणि उन्ह ही केवळ नैसर्गिक क्रिया वाटणार.
म्हणूनच, कधी कधी स्वतःलाच भाग्यवान समजावं...
ज्यांना स्वप्नांचं मोल ठाऊक आहे...
ज्यांना कळ्यांचं दुःख ठाऊक आहे...
ज्यांना अपूर्णतेची गोडी अजूनही छळते आहे
आणि ज्यांचे चित्त अजूनही क्षितिजापार जावयास धडपडते आहे....
जगाचे...जनांचे विश्व आणि मनाचे जग प्रचंड निराळे आहे.
जाणवते सर्वांना पण शोधता येत नाही.
ज्यांना शोधावेसे वाटते...त्यांना जगात परतावेसे वाटत नाही.
म्हणून, हे सुद्धा एक स्वप्नच असू देत...कधीच पूर्तता न होणारे.

काट्याविना न हाती..केव्हा गुलाब यावा? ....
अजून काय सांगायचे!


- संतोष
22.07.2014

Saturday, July 12, 2014

दिल धडकने का सबब...


जगणं हे समृद्ध कधी होतं? आयुष्यमान जास्त असणं, वाढवून घेणं म्हणजे जगणं समृद्ध असणं नव्हे. शरीर वैद्यकीय दृष्ट्या निरोगी राहिलं तरी मानसिकदृष्ट्या विखुरलेलं, आजारी असेल तर जगण्यातला आनंद कसा मिळणार? गुलाम अलीची एक अत्यंत सुरेल गझल कानावर आली...दिल धडकने का सबब याद आया. वाह! कोंदटलेल्या वातावरणात एखादी स्वच्छ, निर्मळ हवेची झुळूक अचानक सुखावून जावी, तसं काहीसं वाटलं. शारीरिकदृष्ट्या जिवंत असणं म्हणजे हृदयाचे कार्य चालू असणं...पण मानसिकदृष्ट्या जिवंत राहायचं असेल तर हरवलेलं काही नुसतं अाठवलं तरी पुरेसं असतं..नाही?

मनाच्या खोल कप्प्यात कधीतरी दरवळलेलं अत्तर वर्तमानातलं भान विसरायला लावतं...जणू काही खोट्याच्या दुनियेत खरंखुरं सापडावं असंच वाटतं. आयुष्य जेव्हा जेव्हा निरस वाटायला लागतं...तेव्हा तेव्हा मनाच्या तळाचा शोध घ्या...तिथंच कुठंतरी तुमचं हक्काचं असं काहीतरी असतंच असतं..हळवं बनवतं पण तितकंच समर्थही बनवतं...कारण, आपल्या असण्याच्या अस्सलतेच्या आसपास आपण पोहोचलेलो असतो. जुनी गाणी, जुनी पत्रं, जुन्या आठवणी यांचे संदर्भ भूतकालीन असले तरी साचलेपण झुकारून देऊन मनाची भाषा पुन्हा एकदा ऐकवण्याचं अदभूत सामर्ध्य त्यात नक्कीच असतं...शेवटी वर्तमान म्हणजे तरी काय, आपलं भविष्य आणि भूतकाळ यांना जोडणारा सेतूच ना...ज्यांच्या जाणीवेतला भूतकाळ हरवतो, त्यांना भविष्यात कधीतरी आपण यंत्रवत बनलो असल्याचं जाणवतं...पण तोवर, मनातल्या त्या जुन्या कुपितला दरवळ पार जिरुन गेलेला असतो...आयुष्य निरस तेव्हा बनतं. म्हणून, आपल्या आवडत्या गाण्यांवर, शब्दांवर, व्यक्तींवर, छंदांवर मनोमन प्रेम करीत राहणं अपरिहार्य आहे. स्वप्नांचे इमले डोळ्यांना सुखावतात, मनाला भावतात...पण तरीही ते आभासीच असतात. याउलट, मनापासून जे काही जगलेले क्षण असतात त्यांचे तत्कालीन आयुष्य कितीही असले तरी ते अजरामरच असतात...प्रत्येकाच्या मनात.

जुनाट तरीही अभंग राही
अवशेषांचे काही शेषपण...
अव्यक्ताच्या व्यक्तवेदना
मम स्वप्नांचे हे विशेषण..!
अक्षर लेवूनि स्वप्ने माझी
कथेत पेरी थरथरलेपण;
ओंजळीतल्या ओंजळीतही
नकळत साचे मम उरलेपण!
गूढ नि गहिरे अगलूज ऐसे
स्वप्न नकळे कुणा दिले..पण;
खोल खोल मम तळात उरले
अवकाशाचे खोल निळेपण..
दूर दूर अन् स्मृतीपटलांवर
क्षितिज कोरिते नवी कहानी;
विस्मृतीत मग दिवेलागणी
वात भिजविते शापित पाणी..
- संतोष देशपांडे



मनाक्षरे...


मनाक्षरे...

आपलं मन हे खरोखरच थक्क करणारं माध्यम. होय माध्यम..कारण, येथे विचारांचे तरंग कायम उमटत असतात. त्यांच्या जवळ जाऊ शकतात, त्यांच्याशी त्यांचा संवाद होतो. आयुष्यात साचलेपण आल्याची भावना झुगारून देणारे सामर्थ्य मनात असतं आणि त्याचवेळी आयुष्यात साचलेपण आणण्यासही तेच कारणीभूत असतं.. कायम भीती आणि भिंती यांच्यात गुदमरण्याची सवय असणाऱ्या आपल्या जगण्यातला आनंद शोधायचा असेल तर मनाची भाषा, त्याची विरामचिन्हे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे मनही उलगता आले पाहिजे. स्वतःच्या मनाची भाषा एकदा का लक्षात आली की इतरांची मनेही सहज ओळखता येतात. मनात कायम निनादत असणाऱ्या भावभावनांतील हळवे तरंग अक्षरांच्या माध्यमातून मनापासून जपणे, जोपासणे ही खरोखरच अद्वितीय अनुभूती ठरते. म्हणूनच, मनाचीही स्वतःची अशी एक भाषा, ती व्यक्त करु पाहणारी अक्षरे, त्यांतून उलगडणारी विविधरंगी अर्थ यांच्या अवकाशात विहरणे सर्वांनाच शक्य होते असे नाही...तरीही आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे?