Saturday, July 12, 2014

दिल धडकने का सबब...


जगणं हे समृद्ध कधी होतं? आयुष्यमान जास्त असणं, वाढवून घेणं म्हणजे जगणं समृद्ध असणं नव्हे. शरीर वैद्यकीय दृष्ट्या निरोगी राहिलं तरी मानसिकदृष्ट्या विखुरलेलं, आजारी असेल तर जगण्यातला आनंद कसा मिळणार? गुलाम अलीची एक अत्यंत सुरेल गझल कानावर आली...दिल धडकने का सबब याद आया. वाह! कोंदटलेल्या वातावरणात एखादी स्वच्छ, निर्मळ हवेची झुळूक अचानक सुखावून जावी, तसं काहीसं वाटलं. शारीरिकदृष्ट्या जिवंत असणं म्हणजे हृदयाचे कार्य चालू असणं...पण मानसिकदृष्ट्या जिवंत राहायचं असेल तर हरवलेलं काही नुसतं अाठवलं तरी पुरेसं असतं..नाही?

मनाच्या खोल कप्प्यात कधीतरी दरवळलेलं अत्तर वर्तमानातलं भान विसरायला लावतं...जणू काही खोट्याच्या दुनियेत खरंखुरं सापडावं असंच वाटतं. आयुष्य जेव्हा जेव्हा निरस वाटायला लागतं...तेव्हा तेव्हा मनाच्या तळाचा शोध घ्या...तिथंच कुठंतरी तुमचं हक्काचं असं काहीतरी असतंच असतं..हळवं बनवतं पण तितकंच समर्थही बनवतं...कारण, आपल्या असण्याच्या अस्सलतेच्या आसपास आपण पोहोचलेलो असतो. जुनी गाणी, जुनी पत्रं, जुन्या आठवणी यांचे संदर्भ भूतकालीन असले तरी साचलेपण झुकारून देऊन मनाची भाषा पुन्हा एकदा ऐकवण्याचं अदभूत सामर्ध्य त्यात नक्कीच असतं...शेवटी वर्तमान म्हणजे तरी काय, आपलं भविष्य आणि भूतकाळ यांना जोडणारा सेतूच ना...ज्यांच्या जाणीवेतला भूतकाळ हरवतो, त्यांना भविष्यात कधीतरी आपण यंत्रवत बनलो असल्याचं जाणवतं...पण तोवर, मनातल्या त्या जुन्या कुपितला दरवळ पार जिरुन गेलेला असतो...आयुष्य निरस तेव्हा बनतं. म्हणून, आपल्या आवडत्या गाण्यांवर, शब्दांवर, व्यक्तींवर, छंदांवर मनोमन प्रेम करीत राहणं अपरिहार्य आहे. स्वप्नांचे इमले डोळ्यांना सुखावतात, मनाला भावतात...पण तरीही ते आभासीच असतात. याउलट, मनापासून जे काही जगलेले क्षण असतात त्यांचे तत्कालीन आयुष्य कितीही असले तरी ते अजरामरच असतात...प्रत्येकाच्या मनात.

जुनाट तरीही अभंग राही
अवशेषांचे काही शेषपण...
अव्यक्ताच्या व्यक्तवेदना
मम स्वप्नांचे हे विशेषण..!
अक्षर लेवूनि स्वप्ने माझी
कथेत पेरी थरथरलेपण;
ओंजळीतल्या ओंजळीतही
नकळत साचे मम उरलेपण!
गूढ नि गहिरे अगलूज ऐसे
स्वप्न नकळे कुणा दिले..पण;
खोल खोल मम तळात उरले
अवकाशाचे खोल निळेपण..
दूर दूर अन् स्मृतीपटलांवर
क्षितिज कोरिते नवी कहानी;
विस्मृतीत मग दिवेलागणी
वात भिजविते शापित पाणी..
- संतोष देशपांडे



No comments:

Post a Comment